चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

दृष्टिक्षेप-महाराष्ट्राच्या कर्तृत्वसंचिताचा शोध

महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांतील नेत्रदीपक कार्यकर्तृत्वाचे सुस्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभा करणारा व समाजाला केवळ आत्मपरीक्षणासच नव्हे तर आत्मचिकित्सेसही प्रवृत्त करणारा हा प्रकल्प आहे.
1960 साली संयुक्त महाराष्ट्र आकारास आला आणि 2010 साली त्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होणार आहे. हे औचित्य साधून आधुनिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचा शोध घेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. समाजातील अनेक व्यक्ती एकाच वेळी अनेक क्षेत्रांत आपापल्या प्रतिभेने, बुद्धीने, चिकाटीने, परिश्रमाने काम करीत असतात आणि अशा कार्यांतूनच सामाजिक संस्कृती साकारत असते. माणसाच्या अंतर्मनावर तिचा प्रभाव असतो. हा प्रभाव दडपण म्हणून असतो, नैतिकतेच्या रूपाने असतो किंवा आंतरिक ऊर्जेच्या स्वरूपात असतो.
व्यक्तीपाशी अशा आंतरिक ऊर्जेचा अभाव असला की, तिला स्वत:चे एकाकीपण त्रस्त करू लागते. तिला यशाच्या सुखाची फळे चाखता येत नाहीत, की अपयशात मानसिक आधार मिळत नाही. अशी व्यक्ती नैराश्याची वाट चालू लागते किंवा तुच्छतागंडाचा बळी ठरते. आपण जी संस्कृती अनुभवत आहोत; ती हजारो, लक्षावधी व्यक्तींच्या कर्तृत्वाचे फळ आहे; ही अनुभूतीच आंतरिक ऊर्जेला प्रेरणादायी ठरत असते. ती यशाने उन्मत्त होऊ देत नाही, की अपयशाने खचू देत नाही. अशी ऊर्जा चरित्रनायकांच्या कथांमधून मिळू शकते म्हणून हा चरित्रकोशाचा प्रपंच.
या चरित्रकोशांत सर्व विचारधारांच्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश करण्यात येणार असून त्यांनी स्वीकारलेल्या तत्त्वज्ञानासंबंधीची चिकित्सा वा आक्षेप याविषयीचा चर्चा केली जाणार नाही. या चरित्रांचे स्वरूप चिकित्सक नसून ते केवळ उपयुक्त माहितीच्या स्वरूपाचे असेल. प्रत्येक विषयाला/खंडाला स्वतंत्र प्रस्तावना असेल व या प्रस्तावनेत ते क्षेत्र कसे घडत गेले, याचा ऊहापोह केला जाईल. त्यामुळे खंडाच्या प्रस्तावनेवरून त्या विशिष्ट क्षेत्रातील शिल्पकारांनी जे काम केले, त्याचे संदर्भही स्पष्ट होण्यास मदत होईल आणि महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा पावणेदोनशे वर्षांचा जिवंत इतिहास वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहील.
हा चरित्रकोश महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, प्रत्येक माध्यमिक शाळेत जावा, प्रत्येक ग्रामपंचायतीत, नगरवाचनालयात संग्रही असावा असा आमचा हेतू आहे. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या प्रकल्पाची माहिती व प्रकाशित होणारे चरित्रकोश खंड पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
या प्रकल्पाच्या रचनेत, कार्यपद्धती निश्चित करणारे आणि त्याच्या कार्यवाहीवर नियंत्रण ठेवणारे केंद्रीय संपादक मंडळ असेल. त्याचबरोबर प्रत्येक विषयाकरिता त्या-त्या विषयाचे स्वतंत्र संपादक मंडळ व सल्लागार मंडळ असेल. नावांचा शोध घेणे, त्यांची निश्चिती करणे व विविध लेखकांकडून चरित्रे लिहून घेणे, हे त्या विषयाच्या संपादक मंडळाचे काम असेल.
या प्रकल्पाअंतर्गत एकूण 12 खंड प्रकाशित होणार आहेत. पहिला खंड हा एकोणिसाव्या शतकापर्यंत महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीची माहिती देणारा इतिहास खंड असेल व अंतिम खंड या भविष्यातील महाराष्ट्राच्या सर्वक्षेत्रीय प्रगतीचा आलेख चितारणारा भविष्यवेध खंड असेल. अन्य दहा खंडांतून पुढील विविध क्षेत्रातील मान्यवर शिल्पकारांची पे"रक चरित्रे देण्यात येणार आहेत - राजकारण, संरक्षण-प्रशासन-न्यायपालिका, समाजकारण-शिक्षण, समाजकारण-धर्म-अध्यात्म, कृषी, उद्योग-अर्थकारण, सहकार, कला-चित्रकला, लोककला, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, साहित्य-नाटक, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान व आरोग्य-ऍलोपथी, आयुर्वेद, होमियोपथी, तत्त्वज्ञ व संशोधक आणि संकीर्ण.
गेल्या दोनशे वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास हा सर्वंकष परिवर्तनाचा इतिहास आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, साहित्य आदी अनेक अनुकरणीय उदाहरणे महाराष्ट्राने जगापुढे ठेवली आहे. या कोशातील माहिती शालेय विद्यार्थ्यापासून विविध क्षेत्रांतील अभ्यासकांपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडणारी आहे.
या प्रकल्पाचे संदर्भमूल्य व प्रेरणामूल्य जाणून या प्रकल्पाला सहयोग देण्याकरिता अनेक प्रायोजकांनी सहाय्य दिले आहे. आर्थिक सहयोग, माहितीसंकलनासाठी सहाय्य, लेखनसहकार्य अशा अनेक प्रकारचे योगदान या प्रकल्पाला लाभत असून महाराष्ट्रभरातील सर्व जनांच्या सहभागामुळे या प्रकल्पाने महाराष्ट्रव्यापी रूप धारण केले आहे व हा प्रकल्प अवघ्या महाराष्ट्राचा बनला आहे.

 

व्हिजन-आंतरिक उर्जेचे प्रकटीकरण

आपल्या पारंपरिक अस्मितेचे रक्षण करण्यासोबत परिवर्तनाच्या क्षितिजावर नव्याने उगवणार्‍या विचारांचे स्वागत करण्याची उदारमतवादी आध्यात्मिक लोकशाही परंपरा महाराष्ट्राच्या मातीत संतांच्या मांदियाळीच्या रूपाने विकसित झाली आहे. या भूमीला जे संत आणि महापुरुष लाभले त्यांनी केवळ आध्यात्मिक मूल्येच नव्हे तर जीवनवादी दृष्टिकोनही या भूमीत रुजवला. त्यामुळे जेव्हा इंग्रजांचे राज्य स्थिरावले आणि त्यांनी सोबत आणलेल्या आधुनिक मूल्यांच्या प्रकाशात जे स्थित्यंतर घडून आले त्या प्रारंभीच्या काळात अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक चळवळींत महाराष्ट्र अग्रभागी राहिला.
नाना शंकरशेठ, रावसाहेब मंडलीक, दादाभाई नवरोजी आदी मंडळी सामाजिक व राजकीय क्रियाशीलतेत अग्रभागी होती. न्या. रानडे यांनी कॉंग्रेसचा तात्त्विक पाया घालण्यास भरीव योगदान दिले. एके काळच्या कॉंग्रेसच्या जहाल आणि मवाळ या दोन्ही प्रवाहांचे नेतृत्व करणार्‍या लो. टिळक व ना. गोखले या व्यक्ती महाराष्ट्रीयच होत्या. म. जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या प्रेरणेने सुरू झालेल्या चळवळीने वंचित वर्गाला आपल्या सामाजिक हक्कांची जाणीव करून दिली आणि त्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणाही दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुमहासभेलाही झळाळी आली, ती स्वा. सावरकरांच्या नेतृत्वामुळेच. कम्युनिस्ट, समाजवादी या पक्षांचे नेतृत्वही प्रारंभीच्या काळात कॉ. डांगे, रणदिवे, अच्युतराव पटवर्धन आदींनी केले. रा. स्व. संघाची स्थापनाही महाराष्ट्रात झाली.
टाटा, किर्लोस्कर आदींनी महाराष्ट्रातच औद्योगिक क्रांतीचा पाया रचला. अण्णासाहेब चिरमुलेंनी युनायटेड वेस्टर्न बॅंकेची स्थापना केली. कॉसमॉस बॅंक, सारस्वत बॅंक, श्यामराव विठ्ठल बॅंक आदींनी सहकारी बॅंकेच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविला. संत विनोबा भावे यांनी भूदान यज्ञाद्वारे देशभर संचार करून जमीन वाटपाच्या प्रश्नावर सामाजिक जाणिवेचे जागरण केले. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदींनी धार्मिक प्रेरणांना सामाजिक आशय दिला. दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीला सुरुवात केली व व्ही. शांताराम आदींनी नवे वळण दिले. राजकीय व सामाजिक बदलांचे प्रतिबिंब महाराष्ट्रातील नाट्यसृष्टीत दिसते.
या कालखंडात देशभरात घडलेल्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक, कला या क्षेत्रांत झालेल्या क्रांतीची मुळे महाराष्ट्रातच सापडतात. या परिवर्तनकाळाप्रमाणे आताच्या नव्या परिवर्तनाच्या कालखंडातही, महाराष्ट्राने एक अग्रेसर राज्य म्हणून देशात आपले स्थान निर्माण करावे यासाठी आंतरिक ऊर्जा निर्माण व्हावी, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
आज जे सकारात्मक प्रयत्न चालू आहेत त्यांना लोकांसमोर आणण्यासाठी एक समान व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. महाराष्ट्रीय कर्तृत्वसंचिताचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आज संघटित प्रयत्नांची गरज आहे. आज सामाजिक प्रेरणेतून काम करणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. अशा कामासाठी आर्थिक संसाधने उपलब्ध करून देऊ शकतात अशीही बरीच मंडळी आहेत व ज्यांच्याकडे अशी योजना तडीस नेण्यासाठी लागणारी उपक्रमशीलता आहे आणि ज्यांच्याकडे यासाठी आवश्यक अशा तंत्रज्ञानाची व कार्यपद्धतीची जाण आहे अशीही मंडळी आहेत. अशा मंडळींना एकमेकांच्या अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी या व्यासपीठावर एकत्र आणणार आहोत. विकासासाठी केवळ राज्यसंस्थेवर अवलंबून न राहता समाज आपणहून विकासपथावर वाटचाल करू शकेल असे बळ देणारे हे व्यासपीठ आहे. भावी पिढीला जीवनसंघर्षाला तोंड देण्याचे आत्मिक बळ देणारे सुयोग्य वातावरण या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे.

 

तत्त्वज्ञान-सकारात्मक अस्मितेचे जागरण
"मानवी संस्कृतीच्या प्रगतीचे प्रत्येक पाऊल हे कुणीतरी एखाद्या व्यक्तीने उचललेले असते. अशी व्यक्ती हीच प्रेरक व पथदर्शक राहते. मानवी संस्कृतीचा विकास हा अशा व्यक्तींच्या परिश्रमांची अंतिम परिणतीच आहे. कारण व्यक्तिमध्येच नवोन्मेषी प्रतिभा व ती साकार करण्याची उर्जा आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यपद्धती विकसित करण्याची क्षमता असते.'- योगी अरविंद
इंग्रजी राजवट भारतात स्थिरावली आणि त्यांची औद्योगिक संस्कृती, वैज्ञानिक क्रांती, बुद्धिवाद, लोकशाही विचार, व्यक्तिस्वातंत्र्य, न्यायासनासमोर सर्व माणसे समान असलेली न्यायव्यवस्था ही मूल्ये आणि नवी प्रशासकीय व्यवस्था व शिक्षण पद्धती यांचा येथील समाजाला परिचय झाला. त्यांची मूल्यव्यवस्था रुजत असतानाच आपण एका विदेशी सत्तेच्या जोखडाखाली आहोत याची बोच येथील समाजधुरिणांना होती.
इंग्रजांना एखाद्या लढाईत पराभूत करून त्यांचे राज्य जाणार नाही तर ज्या यंत्रसंस्कृतीने, एकात्म भावाने व व्यवस्थापन शास्त्राने मूठभर इंग्रज प्रबल बनले आहेत त्याचा अंगीकार केल्याशिवाय आपली अस्मिता तग धरू शकणार नाही हा विचार या भूमीतील महापुरुषांच्या मनात प्रबळ झाला आणि एका नव्या मूल्यरचनेनुसार समाजपरिवर्तनाला प्रारंभ झाला. या मूल्यरचनेत व्यक्ती हा घटक केंद्रस्थानी होता.
पूर्वी भारतीय कृषी संस्कृतीतील व्यक्तीचा जीवनोद्देश, विकास, अर्थार्जनाचा मार्ग, समाजातील स्थान, सामाजिक प्रक्रियेतील सहभाग हा जातीनेच निश्र्चित होत असे. भारतीय समाजजीवन हे जातीभोवती गुंफले होते. जात हा धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, आर्थिक व सांस्कृतिक घटक होता. जात ही स्वतंत्र अस्मिता असलेली, पण परस्परावलंबी असणारी व्यवस्था होती. जागृत होणाऱ्या नव्या जाणीवांमुळे जातीतून निर्माण होणारी व्यक्तीची ओळख आणि व्यक्ती म्हणून तिचे असलेले स्वतंत्र अस्तित्व या दोन संकल्पनांत मूलभूत संघर्ष निर्माण झाला.
इंग्रजांनी आणलेल्या परिवर्तनाला स्वीकारत, त्याला कालसुसंगत व्यवहाराची जोड देत परंतु आपले आत्मभान न सोडता आपल्याला सामर्थ्यसंप बनवून या जीवनसंघर्षात विजयी होता येईल असा त्यांना विश्वास होता. आपल्या अस्मितेचे आणि आत्मतत्वाचे सूत्र या महापुरुषांनी कोठेही क्षीण होऊ दिले नाही की तुटू दिले नाही. जुनी व्यवस्था जाऊन नवी व्यवस्था येण्याचा हा कालखंड महाराष्ट्राच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचा इतिहास सांगणे, हा या प्रकल्पाचा हेतू आहे.
गेल्या दोन दशकांत संपर्क-तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे जग झपाट्याने बदलत आहे. जागतिकीकरणाच्या प्रकि"येच्या वेगवान वावटळीत स्वत:च्या पायाखालची जमीन स्थिर राहावी म्हणून अस्मितांच्या दृढीकरणाची प्रक्रियाही तितकीच वेगवान होत आहे. एक मराठी, महाराष्ट्रीय म्हणून आपली अस्मिता काय? या प्रश्नाचा या इतिहासाच्या संदर्भात विचार करावा लागेल. आपले सामर्थ्य आणि आपली दुबळी स्थाने यांवर विचारमंथन करावे लागेल व त्यातून उचित बोध घेऊनच आजच्या काळात आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करावे लागणार आहे.
आगामी काळातील समस्यांची उत्तरे जुन्या संचिताच्या बळावर शोधता येतात. कारण त्यातून याचे दिग्दर्शन होत असते. या प्रकल्पामुळे या चैतन्याने भारलेल्या व्यक्ती उभ्या राहतील व त्या सकारात्मक कार्यप्रेरणेने कार्यरत होतील असा आम्हाला विश्वास वाटतो.

 

मिशन- ध्येय
इतिहासाची प्रेरणा, वर्तमानाचे भान व भविष्याची स्वप्ने
"इतिहासापासून प्रेरणा घ्यावी, पण तोच आपल्या कर्तृत्वाचा सर्वोच्चबिंदू आहे असे मानू नये. वर्तमानाचे भान ठेवावे पण त्याच्या मर्यादांनी स्वत:ला बांधून घेऊ नये. इतिहासापासून प्रेरणा घेत, वर्तमानाचे भान ठेवत, भविष्याच्या कालपटावर आपल्या कर्तृत्वाची पदचिन्हे उमटवण्याची जिद्द बाळगावी.' - पं. दीनदयाळ उपाध्याय
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भारत जगातील महासत्ता बनण्याची स्वप्ने पहात आहे. महाराष्ट्राला भारतातील एक अग्रेसर राज्य म्हणून आपली भूमिका वठवायची नवी संधी चालून आलेली आहे. पूर्वी सारा देश गुलामीत जखडला असताना शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले होते आणि नंतरच्या भीमथडीची मराठी तट्टे अटकेपार जाऊन पोचली होती. समाजातील साधनसंप व कर्तृत्वसंप व्यक्ती आपल्या अतिरिक्त साधनसामग्रीचा उपयोग कोणत्या प्रकारे करतात, यावर त्या समाजाची सुसंस्कृतता व संपता अवलंबून राहते. ज्ञानसंप होण्यासाठी अमेरिकेमध्ये व युरोपमध्ये जी गुंतवणूक केली गेली, त्यामुळे तेथील समाज ज्ञानविज्ञानात अग्रभागी राहिला. एकोणिसाव्या शतकातील मुंबईतही तत्कालीन व्यक्तींनी दूरदृष्टी ठेवून जी गुंतवणूक केली; त्यातून एशियाटिक लायब्ररी, जे. जे. हॉस्पिटल, जहांगीर स्कूल ऑफ आर्टस्‌ यांसारख्या संस्थांची निर्मिती झाली. या व्यक्तींचे व त्यांच्या भूमिकांचे या प्रकल्पातून स्मरण व्हावे असा आमचा प्रयत्न आहे.
आज तंत्रविज्ञानाच्या, उद्योगव्यापाराच्या बळावर जागतिक बाजारपेठ जिंकण्याचे आव्हान महाराष्ट्रापुढे आहे. या जागतिकीकरणाबरोबर केवळ ऐहिक सुखांच्या मागे लागलेला व सामाजिक संवेदना हरवून बसलेला मध्यमवर्ग निर्माण झाला. पण हे चित्र सावकाश आणि निश्चितपणे बदलत आहे. सामाजिक कामात भाग घेण्याची इच्छा असलेला पण सुयोग्य काम कसे शोधायचे, याची कल्पना नसलेला एक मोठा वर्ग आजही अस्तित्वात आहे.
व्यक्तिगत कर्तृत्वाला नवे धुमारे फुटण्याला पोषक वातावरण समाजात आहे व आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी नवनव्या संधी उपलब्ध होत आहेत. परंतु व्यक्तिगत विकासविषयक आकांक्षा आणि सामाजिक प्रेरणा यांत पुरेसे संतुलन साधता आले नाही तर एकांगीपणा निर्माण होतो. नव्या व्यक्तिकेंद्रीत मूल्याच्या वावटळीत सामाजिक संवेदना व जाणिवा हरवता कामा नये.
आपली सामाजिक अस्मिता व एकजिनसीपणा टिकवण्यासाठी परिपूर्ण समाजविकासाचे ध्येय प्रकल्पाने समोर ठेवले आहे. त्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शिल्पकारांचा कर्तृत्वसंदेश पोहचवून तिला भविष्यकाळात सक्रिय बनविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात अनेक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. "राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' या ओळींसोबत "सुंदर देशा, संपन्न देशा, सुवर्णमय देशा' या नव्या ओळींना जोडण्याची आस निर्माण करणारा हा आश्र्वासक प्रकल्प आहे.