चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

प्रकल्पामागची भूमिका

"आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश' या प्रकल्पाविषयी चर्चा करीत असताना तीन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जातात. चरित्रकोशच का? हा पहिला. या प्रकल्पासाठी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा कालखंडच का निवडला? हा दुसरा आणि हा प्रकल्प आत्ताच करण्याचे प्रयोजन काय व आत्ताच्या कालखंडात त्याचा उपयोग काय? हा तिसरा. या प्रकल्पासंबंधी भूमिका मांडताना या तिन्ही प्रश्नांच्या संदर्भात लिहिणे औचित्यपूर्ण होईल.
जेव्हा व्यक्तीच्या प्राथमिक गरजांपासून अहंकापूर्तीपर्यंतच्या ऐहिक गरजा संपतात, तेव्हा "मी कोण' असा त्याचा आत्मशोध सुरू होतो. या आत्मशोधाला अनेक परिमाणे असतात. हा शोध घेत असताना ती व्यक्ती ज्या सांस्कृतिक पर्यावरणात वाढलेली असते, तिच्या संदर्भात तो शोध घेणे अपरिहार्य असते.
मानवी संस्कृती ही अनेकपदरी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. एकाच वेळी अनेक व्यक्ती अनेक क्षेत्रांत अनेक ठिकाणी आपापल्या प्रतिभेने, बुद्धीने, चिकाटीने, परिश्रमाने काम करीत असतात आणि अशा कार्यांतूनच सामाजिक संस्कृती नावाची व्याख्या करायला अवघड, पण नित्य अनुभवायला येणारी गोष्ट साकारत असते. माणसाच्या अंतर्मनावर तिचा प्रभाव असतो. हा प्रभाव दडपण म्हणून असतो, नैतिकतेच्या रूपाने असतो किंवा आंतरिक ऊर्जेच्या स्वभावात असतो. आत्मशोध हा अशा आंतरिक ऊर्जेचा शोध असतो. व्यक्तीपाशी अशा आंतरिक ऊर्जेचा अभाव असला की, तिला स्वत:चे एकाकीपण त्रस्त करू लागते. तिला यशाच्या सुखाची फळे चाखता येत नाहीत, की अपयशात मानसिक आधार मिळत नाही. अशी वक्ती नैराश्याची वाट चालू लागते किंवा तुच्छतागंडाचा बळी ठरते. आपण जी संस्कृती अनुभवत आहोत; ती हजारो, लक्षावधी व्यक्तींच्या कर्तृत्वाचे फळ आहे; ही अनुभूतीच आंतरिक ऊर्जा प्रेरणादायी करण्यात मदत करत असते. ती यशाने उन्मत्त होऊ देत नाही, की अपयशाने खचू देत नाही. अशी ऊर्जा चरित्रनायकांच्या कथांमधून मिळू शकते म्हणून हा चरित्रकोशाचा प्रपंच. शिल्पकार चरित्रकोश हा दोनशे वर्षांच्या बदलांतील मानवी चेहरा शोधण्याचा एक प्रयत्न आहे.
एके काळी भारत हा ज्ञानाच्या आणि समृद्धीच्या क्षेत्रात अग्रेसर होता. आजच्या परिभाषेत सांगायचे, तर भारत एक जागतिक महाशक्ती होता. केवळ तत्त्वज्ञानात व आध्यात्मिक शक्तीच्या व्यावहारिक उपयोजनातच नव्हे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही तो अग्रभागी होता. शल्वसूत्रामध्ये लिहिलेला पायथागोरसचा सिद्धान्त असो; शून्याचा शोध असो; आयुर्वेद किंवा महर्षी दयानंदांनी केलेले अणूविषयक तर्क असोत; वराहमिहीर, आर्यभट्ट, भास्कराचार्य यांच्यासारखे गणितज्ज्ञ; पाणिनीसारखा व्याकरणकार; पतंजलीसारखा योगसूत्रे लिहिणारा श्रेष्ठ मानसशास्त्रज्ञ; तक्षशीला, वाराणसी, नालंदा यांसारखी अनेक देशांतील विद्यार्थ्यांचे आकर्षण केंद्र बनलेली जागतिक विद्यापीठे असोत. प्राचीन भारताच्या बुद्धिवैभवाबद्दल, समृद्धीबद्दल, कर्तृत्वाबद्दल आणि नैतिकतेबद्दल सांगता येणार्‍या अशा अनेक बाबी आहेत. युरोपमधील देशांना भारत शोधण्याची गरज निर्माण व्हावी आणि त्यातून कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावावा, ही गोष्टच भारताचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील महत्त्व स्पष्ट करणारी आहे.
परंतु आजवर अज्ञात असलेल्या काही कारणांनी भारतीय संस्कृतीतील आंतरिक ऊर्जा क्षीण झाली. तिचा विकास थांबला, ती विदेशी आक्रमणाचा बळी ठरली. गेल्या जवळजवळ आठशे ते हजार वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडाने भारतीय संस्कृतीचे प्रारंभीच्या ज्ञानोन्मुख, कर्तृत्वप्रधान, प्रतिभासंप परंपरेशी असलेले नाते तोडून टाकले आणि कर्मकांडाधिष्ठित, जातिनिष्ठ, आत्मकेंद्रित, सजनशीलता हरवलेली समाजव्यवस्था दृढमूल झाली. याही काळात काही कर्तृत्वशिखरे पाहायला मिळतात. पण ती अपवादात्मक स्वरूपात. महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या रूपाने एक तेजोमय कर्तृत्वशिखर निर्माण झाले खरे. पण त्या कर्तृत्वशिखराला पेलण्याइतकाही इथला समाज समर्थ नव्हता.
याच काळात युरोपमधला काळोखाचा काळ संपून तिथे वैज्ञानिक क्रांतीच्या ज्ञानाचा प्रकाश पडू लागला होता. त्यातून निर्माण झालेल्या औद्योगिक संस्कृतीच्या प्रकाशाने जीवनाची सर्वच क्षेत्रे झळाळून उठली. भारतात ब्रिटिश सत्तेच्या रूपाने या औद्योगिक क्रांतीने प्रवेश केला.
या प्रकल्पासाठी दोनशे वर्षांचाच कालखंड निवडण्याची कारणे दोन आहेत. एक व्यावहारिक. मराठी भाषेच्या आरंभापासून या प्रकल्पाची सुरुवात केली असती, तर ती पेलणे "विवेक'सारख्या संस्थेला अवघड गेले असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकोणिसाव्या शतकात दृढमूल झालेल्या ब्रिटिश सत्तेने केवळ सत्तांतरच घडवले नाही तर ती एका युगपरिवर्तनाचीही सुरुवात होती. ब्रिटिश सत्तेच्या रूपाने युरोपमधील लोकशाही राज्यव्यवस्था अंगीकृत केलेल्या, औद्योगिक संस्कृतीने सबळ बनलेल्या, व्यापारवाढीच्या निश्चित हेतूशी बांधील असलेल्या, ज्ञानोपासनेचे महत्त्व समजणाऱ्या व त्या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करण्याची मुत्सद्देगिरी असलेल्या, व्यक्तिनिष्ठतेपेक्षा संस्थाजीवनाला प्राधान्य देणाऱ्या, दूरदर्शीपणे सुनियोजित राज्यव्यवस्था उभी करण्याची क्षमता असलेल्या संस्कृतीचा, भारतासारख्या प्राचीन तत्त्वज्ञानाने समृद्ध, वरवर पाहता अराजकसयदृश व्यवस्था भासणार्‍या, पण अगदी ग्रामीण पातळीपर्यंत घट्ट सामाजिक वीण असलेल्या, परंतु नवसजनशील ऊर्जा हरवलेल्या अशा संस्कृतीशी संबंध आला. आचार्य जावडेकरांच्या शब्दांत सांगायचे तर ""युरोपातील व्यापारी पेशाचे साम्राज्यवर्धक लोक जर सतराव्या व अठराव्या शतकात हिंदुस्थानात आलेच नसते, तर मोडलेली मोगल बादशाही नामशेष करून दिल्लीत मराठेशाही किंवा हिंदुपदबादशाही स्थापन होऊ शकली असती, अशी आपणास कल्पना करता येईल; पण असल्या कल्पना करण्यात काहीच अर्थ नाही. युरोपात जी नवी व्यापारी संस्कृती निर्माण झाली, तिच्याशी टक्कर देण्याचे सामर्थ्य हिंदी संस्कृतीत अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात उरले नव्हते आणि आधुनिक, मध्ययुगीन किंवा प्राचीन, कोणत्याच स्वरूपाचे स्वराज्यरक्षण अथवा स्वराज्यसंस्थापन करण्यास ती असमर्थ बनली होती, हे मान्य करणे भाग आहे. मुसलमानी साम्राज्य व त्यातून निर्माण झालेली राज्ये मराठ्यांनी खिळखिळी आणि निर्जीव केली होती. आता आपण हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता बनणार, अशी आशा मराठ्यांना वाटू लागली होती; इतक्यात इंग्रजांनी त्यांची सत्ता खिळखिळी केली आपण आधुनिक राष्ट्रीयत्वाचे धडे आमच्यापासून घेतल्याखेरीज तुम्ही या जगात स्वतंत्रतेने नांदू शकत नाही, अशी भारतीय हिंदूंची व मुसलमानांची त्यांनी खात्री करून दिली. इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त झाल्यापासून, प्राचीन व मध्ययुगीन भारताचा अंत झाला आणि आधुनिक भारताचा इतिहास अथवा भारताचा आधुनिक इतिहास सुरू झाला.''
ब्रिटिश सत्ता येण्यापूर्वी कृषी संस्कृतीतील भारतीय समाजजीवन हे जातीभोवती गुंफले होते. जात हा धार्मिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आर्थिक व सांस्कृतिक घटक होता. जात ही स्वतंत्र अस्मिता असलेली, पण परस्परावलंबी असणारी व्यवस्था होती. व्यक्तीचा जीवनोद्देश, विकास, अर्थार्जनाचा मार्ग, समाजातील स्थान, सामाजिक प्रक्रियेतील सहभाग हा जातीनेच निश्र्चित होत असे. जातीबाहेर व्यक्तीला स्वातंत्र्य नसे, अस्तित्व नसे. जसे आजच्या काळात बिनदेशाचा माणूस असूच शकत नाही, तसेच कृषिसंस्कृतीत बिनजातीच्या माणसाला सामाजिक स्थान नव्हते.
इंग्रजी राजवटीबरोबर औद्योगिक संस्कृती, वैज्ञानिक क्रांती, बुद्धिवाद, न्यायासनासमोर सर्व माणसे समान असलेली न्यायव्यवस्था ही मूल्ये आणि नवी प्रशासकीय व शिक्षण पद्धती यांचा उदय झाला. म्हणजेच एका नव्या मूल्यरचनेनुसार समाजपरिवर्तनाला प्रारंभ झाला. या मूल्यरचनेत व्यक्ती हा घटक केंद्रस्थानी होता. त्यामुळे जातीमुळे निर्माण होणारी व्यक्तीची ओळख आणि व्यक्ती म्हणून तिचे असलेले स्वतंत्र अस्तित्व या दोन संकल्पनांत मूलभूत संघर्ष निर्माण झाला.
महाराष्ट्राच्या संदर्भात जुनी व्यवस्था जाऊन नवी व्यवस्था येण्याचा हा कालखंड महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्याचा इतिहास सांगणे, हा या प्रकल्पाचा हेतू आहे. गेल्या दोन दशकांत संपर्क-तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे जग झपाट्याने बदलत आहे. जागतिकीकरणाची प्रक्रिया जशी वाढीला लागली आहे, तसेच या जागतिकीकरणाच्या वावटळीत स्वत:च्या पायाखालची जमीन स्थिर राहावी म्हणून अस्मितांच्या दृढीकरणाची प्रक्रियाही तितकीच वेगवान होत आहे. एक मराठी, महाराष्ट्रीय म्हणून आपली अस्मिता काय? या प्रश्नाचा या संदर्भात विचार करावा लागेल. आपले सामर्थ्य आणि आपली दुबळी स्थाने यांवर विचारमंथन करावे लागेल.
या स्थित्यंतराच्या प्रारंभीच्या काळात अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक चळवळींबाबत महाराष्ट्र अग्रभागी राहिला. नाना शंकरशेठ, रावसाहेब मंडलीक, दादाभाई नवरोजी आदी मंडळी राजकीय क्रियाशीलतेत अग्रभागी होती. न्या. रानडे यांनी कॉंग्रेसचा तात्त्विक पाया घालण्यास भरीव योगदान दिले. एके काळच्या कॉंग्रेसच्या जहाल आणि मवाळ या दोन्ही प्रवाहांचे नेतृत्व करणार्‍या लो. टिळक व ना. गोखले या व्यक्ती महाराष्ट्रीयच होत्या. म. जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या प्रेरणेने सुरू झालेल्या चळवळीने दलित वर्गाला आपल्या सामाजिक हक्कांची जाणीव करून देऊन त्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदुमहासभेलाही झळाळी आली, ती स्वा. सावरकरांच्या नेतृत्वामुळेच. कम्युनिस्ट, समाजवादी या पक्षांचे नेतृत्वही प्रारंभीच्या काळात कॉ. डांगे, रणदिवे, अच्युतराव पटवर्धन आदींनी केले. रा. स्व. संघाची स्थापनाही महाराष्ट्रात झाली. टाटा, किर्लोस्कर आदींनी महाराष्ट्रातच औद्योगिक क्रांतीचा पाया रचला. अण्णासाहेब चिरमुलेंनी युनायटेड वेस्टर्न बॅंकेची स्थापना केली. कॉसमॉस बॅंक, सारस्वत बॅंक, श्यामराव विठ्ठल बॅंक आदींनी सहकारी बॅंकेच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविला. संत विनोबा भावे यांनी भूदान यज्ञाद्वारे देशभर संचार करून जमीन वाटपाच्या प्रश्नावर सामाजिक जाणिवेचे जागरण केले. संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदींनी धार्मिक प्रेरणांना सामाजिक आशय दिला. दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम आदींनी चित्रपटसृष्टीला सुरुवात केली व नवे वळण दिले. क्षेत्रांत घडणाऱ्या राजकीय व सामाजिक बदलांचे प्रतिबिंब महाराष्ट्रातील नाट्यसृष्टीत दिसते. या कालखंडात देशभरात घडलेल्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक आर्थिक कला या क्षेत्रांत झालेल्या क्रांतीची मुळे महाराष्ट्रातच सापडतात.
परिवर्तन प्रक्रियेतील पहिल्या कालखंडावर असलेला महाराष्ट्राचा प्रभाव हा नंतरच्या काळावर राहिलेला दिसत नाही. हे का घडले, याची कारणमीमांसा अनेक प्रकारे करता येईल. मराठी माणसाला इतिहासाचे वेड असल्याने इतिहासकालीन मीमांसेवर भरपूर चर्चा, ऊहापोह होऊ शकतो. पण त्याचबरोबर आजचे जे संक्रमण येऊ घातले आहे, त्याचाही विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
मध्ययुगीन समाजजीवन धर्मप्रधान होते, औद्योगिक संस्कृतीनंतर ते राजकारणकेंद्री बनले, तर आता ते तंत्रज्ञान, अर्थशक्ती आणि मनुष्यासबंधांचे व्यवस्थापन यांवर अवलंबून राहील अशी चिन्हे दिसत आहेत. अर्थविचार हा आरंभापासूनच महाराष्ट्राच्या भावविश्र्वातील कच्चा दुवा राहिला आहे. मराठ्यांच्या पराभवाची कारणमीमांसा करताना इतिहासतज्ज्ञ श्री. त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात, ""मराठ्यांजवळ पैसा असलेला असा कधी दिसत नाही. म्हणजे राज्यात संपत्तीची पैदासच दिसत नाही. प्रत्येक स्वारीचा व्यवहार आतबट्ट्याचा असण्याचा संभव फार... सबंध मराठेशाहीत वैश्यवृत्तीकडे अगदी दुर्लक्ष झाले. वैश्यांच्या संपत्तीवाचून ब्राह्मणांची विद्या व क्षत्रियांचे शौर्य लंगडे, हे आम्ही स्वाभिमानाच्या भरात विसरलो.'' शेजवलकरांचे हे विवेचन बोलके आहे. नव्या परिस्थितीच्या संदर्भात त्यावर विचार करता येईल काय? समृद्ध भारतातील समृद्ध व सामाजिक सुसंवाद असलेल्या संप महाराष्ट्राचे चित्र पाहता येईल काय? बाराव्या खंडात तो करण्याचा प्रयत्न केला आहे. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या परिवर्तनकाळात जी ऊर्जा महाराष्ट्राने दाखविली तीच ऊर्जा या नव्या परिवर्तनाच्या कालखंडात दाखवून महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य म्हणून देशातील आपले स्थान निर्माण करणार काय, हा कळीचा प्रश्न आहे. ते प्राप्त करण्याची आंतरिक ऊर्जा निर्माण व्हावी, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.